The Mystery of the Swinging Swing
” नाईट शिफ्टला cctv बघण्याची मजाच काही तरी वेगळी आहे. ” पोलीस स्टेशन मध्ये, इन्स्पेक्टर शिव साळसकर हातात गरमागरम चहाचे घुटके घेत आणि समोरील LCD वर बघत बोलत होते.
” हो ना, 2 जणांना पोलीस व्हॅन मध्ये पेट्रोलिंग ला पाठवले आहे आणि आपण चौघे जण पोलीस स्टेशन मध्ये cctv ने शहरभर लक्ष ठेवू शकतो कुठे काही गडबड दिसली तर पटकन पेट्रोलिंग टीम ला ऑर्डर करू शकतो.” शिव चा सहकारी रवी म्हणाला.
” तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहेत हे बघा cctv नंबर २० जो आपल्या स्टेशन पासून ५ मिनिटे लांब असलेल्या गार्डन मध्ये लावलेला आहे तिथे मला काहीतरी गडबड दिसत आहे. सुधीर, तू जरा हा cctv नंबर २० झूम कर.” चौथा इन्स्पेक्टर समीर म्हणाला.
समीर च्या ऑर्डर प्रमाणे सुधीर ने LCD स्क्रीन वर cctv नंबर २० झूम केला आणि चौघेही जण बघू लागतात तेव्हा समोर दिसते…….
एका गार्डन मध्ये एक रिकामा झोपाळा जोरजोरात हालत असतो ज्याच्या समोर एक ६ फूट उंच माणूस शांतपणे स्तब्ध उभा राहून बघत असतो आणि दुसरा एक १६/१७ वर्षाचा किशोरवयीन मुलगा त्या रिकाम्या हलणाऱ्या झोपाळ्याच्या अवती-भवती फिरून मोबाईल ने शूटिंग करीत असतो.
“आरे, हा रिकामा झोपाळा बघ, किती जोर-जोरात हालत आहे! जसे काही त्या झोपाळ्यावर कोणीतरी बसले आहे आणि झोका घेत आहे. काही भुताटकी आहे कि काय ?” शिव आश्चर्याने म्हणाला.
” भुताटकी वगैरे काही नाहीये, हे या दोघांचेच काहीतरी षडयंत्र चालू आहे.” समीर म्हणाला.
” तो कसा काय?” सुधीर म्हणाला .
” हा जो समोर एकटक, शांतपणे, बघत जो माणूस उभा आहे ना त्याने आपल्या पायाच्या आंगठ्याला बारीकशी इन्व्हिसिबल रस्सी बांधली असेल आणि त्याने तो झोपाळा जोर-जोरात हलवत असेल. आणि हा मोबाईल ने शूटिंग करणारा मुलगा त्याचा व्हिडीओ बनवून सर्व शहरात व्हायरल करेल आणि अफवा
पसरवातील कि गार्डन मध्ये भूत आहे !.” समीर म्हणाला.
” हरामखोर कुठला, आत्ताच आपण आपल्या पेट्रोलिंग टीमला सांगून गार्डन मध्ये या दोघांना पकडायला सांगूया” असे म्हणून सुधीर आर. टी. वरती बोलतो..”अलोक come in , alok come in , “
” अलोक here , अलोक here , go ahed ,” अलोक ने रिप्लाय केला.
” अलोक तू आणि नितिश,तुम्ही दोघे आत्ताच्या-आत्ता गांधी उद्यान जे चराई मध्ये आहे तिथे जा आणि तिथे २ माणसे नकली व्हिडीओ बनवून शहरात भीती निर्माण करतील ! त्यांना पकडून पोलीस स्टेशन मध्ये आण. ओव्हर .”
हे ऐकल्यावर अलोक आणि नितिश दोघे पोलीस व्हॅन गांधी उद्यानाच्या दिशेने वळवतात पण तेवढ्यात सुधीर LCD वर बाघतो कि तिथे जो स्तब्ध उभा राहिलेला माणूस असतो तो नाहीसा झाला आहे आणि झोपाळा हलायचा थांबला आहे. त्याबरोबर त्याचे शूटिंग करणारा मुलगा सुद्धा शूटिंग थांबवून गार्डन च्या बाहेर जायला लागतो. गार्डन पासून थोडे दूर गेल्या वर दुसऱ्या एका व्यक्ती ला भेटतो. ती व्यक्ती अगोदर बागेत उभी असलेल्या माणसा सारखीच दिसत असते. तो मुलगा त्या व्यक्तीला फोन दाखवत असतो. त्यावरून सुधीर,रवी, समीर आणि शिव अंदाज घेतात कि हि दोघे तो व्हिडीओ सोशल मीडिया वरून व्हायरल करीत आहेत, सुधीर पुन्हा अलोक ला आर टी वर बोलावतो आणि रस्त्यावर ते दोघे जेथे उभे होते त्या जागेवरून उचलून पोलीस स्टेशन मध्ये आणायला सांगतो.
थोड्या वेळातच आलोक आणि नितीश त्या दोघाना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येतात. ती आल्यावर पोलीस सर्वात पहिले त्यांचे फोन ताब्यात घेतात आणि फोन चा डेटा चेक करू लागतात. त्याबरोबर शिव त्यांना प्रश्न विचारतो …….
“काय नाव आहे तुमचे ?”
“माझे अर्जुन “
“आणि माझे ध्रुव ” दोघे उत्तर देतात.
“वय काय आहे तुम्हा दोघांचे ?” समीर विचारतो.
“१७ ” अर्जुन
“२०”ध्रुव
“तुमच्या दोघांचे फोन अनलॉक करून द्या” सुधीर ओरडला.
त्याप्रमाणे दोघेही फोन अनलॉक करतात आणि समीर त्यांचा फोन बघायला लागतो.
” काय रे, रात्रीचे दोन वाजता गार्डन मध्ये रिकामा झोपाळा हलवण्याचे शूटिंग करून, शहरात भूताचा खोटा व्हिडीओ व्हायरल करून, शहरात दहशत करायची आहे काय ? आत टाकू का तुम्हाला ?” शिव त्याच्या वर जोरात खेकसला.
त्यांचा ओरडा ऐकून अर्जुन आणि ध्रुव दोघांच्या अंगाचा थरकाप होतो. थरथरत्या आवाजात ध्रुव बोलला……” आ……ते …..ते म्हणजे आम्हाला तसे काही करायचे…….म्हणजे मी नाही……या अर्जुनला तसे
काही करायचे नव्हते. त्याला भीती वाटत नव्हती म्हणून तो एकटाच शूटिंग करून आला…”
“चूप……! आम्ही मघाशीच cctv कॅमेराचे शूटिंग पहिले आहे तू झाडाच्या बाजूला उभा राहून रिकामा झोपाळा हलवत होता आणि हा अर्जुन ! पुढच्या बाजूने मोबाईल ने शूटिंग करत होता. त्यामुळे लोकांना वाटेल कि रिकामा झोपाळा हालत आहे .” समीर पुन्हा त्यांच्यावर जोरात खेकसला.
त्याच्या खेकसण्याने आणि वटारलेल्या डोळ्यांनी ध्रुव मान खाली घालून, थर-थर कापत शांत उभा राहिला.
तरी अर्जुन धीर एकवटून म्हणाला…..” नाही साहेब, गार्डन मध्ये मी एकट्यानेच जाऊन शूटिंग केले होते. हा ध्रुव तर गार्डन च्या बाहेर उभा होता त्याला तर आत मध्ये यायला भीती वाटत होती. त्यावेळी गार्डन मध्ये मी एकटाच होतो. तुम्ही माझा व्हिडीओ बघा…….”
” चूप, त्या आगोदर तू आमचे cctv कॅमेरा चे फुटेज बघ.” असे म्हणून सुधीर कॉम्पुटर मॉनिटर वर cctv फुटेज दाखवतो. त्या फुटेज मध्ये दिसते…. एक ६ फुटाची काळी मनुष्याकृती एका झाडाच्या बाजूला शांत उभी आहे आणि तिथे काही वेळात अर्जुन येतो आणि रिकाम्या झोपाळ्याचे मोबाईल ने शूटिंग करायला लागतो.
” हे बघ या cctv मध्ये झाडाच्या बाजूला ध्रुव उभा आहे.” सुधीर, अर्जुन आणि ध्रुवाला मॉनिटर दाखवून बोलतो.
अर्जुन,” नाही साहेब,मी गार्डन मध्ये एकटाच शूटिंग करीत होतो. तुम्हीच बघा या व्यक्ती मध्ये आणि ध्रुव मध्ये किती फरक आहे हा माणूस ६ फूट उंच आहे आणि ध्रुव ची उंची जेमतेम ५ फुटाची आहे. हे पण एक भूतच आहे !”
“चूप, भूत वगैरे काहीही नसते, आत्ता पुन्हा भूत बोललास तर कानाखाली आवाज काढेन”, असे म्हणून शिव, अर्जुन वर हात उगारतो, तेवढ्यात त्याला अडवून समीर म्हणतो,” साहेब, तो जे म्हणतो आहे ते बरोबर आहे!”
” काय बरोबर आहे ? कि, त्या बागे मध्ये भूत आहे ? झाले का, आता तू पण हेच बोलतोस ?” शिव असे बोलून समीर कडे रागाने बघू लागतो.
समीर ,” मी नाही,अर्जुन च्या मोबाईल मधला व्हिडीओ हे दाखवतो! हा विडिओ आणि cctv फुटेज दोनीही एकत्र बघा !!”
असे बोलून समीर अर्जुन चा मोबाईल आणि मॉनिटर वर चे रेकॉर्डिंग सगळ्यांना एकत्र दाखवतो. ते बघितल्या वर सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो.
cctv फुटेज मध्ये झाडाच्या शेजारी जी काळी मनुष्याकृती दिसत असते ती अर्जुन च्या व्हिडीओ मध्ये आजिबात दिसत नव्हती !
हा सगळा प्रकार पाहून पोलीस स्टेशन मध्ये ५ ते १० मिनिटे शांतता पसरली ! कोणाला काय बोलावे ते काही कळतच नव्हते, तेवढ्यात नितीश, शांततेचा भंग करून म्हणाला…….
“साहेब, मला वाटते याचा संबंध ८दिवसापूर्वी घडलेल्या रोड ऍक्सीडेन्ट शी असेल ! ८ दिवसापूर्वी याच गार्डन च्या बाहेर काही अंतरावर एक रोड ऍक्सीडेन्ट झाला होता त्यात मृत झालेल्या व्यक्ती ची शरीरयष्टी या cctv मधील माणसाशी मिळती-जुळती आहे. आपल्या पोलीस ठाण्यात ८ दिवसापूर्वी अशीच नाईट शिफ्ट ला याच कॉम्पुटर वर त्याच ऍक्सिडेंट ची FIR सेव्ह केली होती. गार्डन मधला हा झोपाळा सुद्धा गेल्या ८ दिवसां पासून असाच रात्रीचा रिकामा झोका घेत आहे. तुम्ही गार्डन मधल्या cctv चे ८ दिवसापूर्वीचे म्हणजे या महिन्याच्या १९ तारखेच्या अगोदरचे रेकॉर्डिंग बघा ……… त्यामध्ये हा झोपाळा एकदम नॉर्मल दिसतो !”
नितीश च्या बोलण्या वरून सुधीर ने डेस्क टॉप वरती त्या cctv चे १९ तारखेच्या अगोदरचे २ तीन महिन्या चे रेकॉर्ड चेक केले त्या २/३ महिन्याच्या काळात प्रत्येक दिवस-रात्र गार्डन मधला तो झोपाळा एकदम नॉर्मल दिसतो.
“साहेब, मी एक बोलू ?” ध्रुव हात वर करून म्हणाला.
“हा बोल, आणि एक कशाला? बोलतोस दोन बोल, तीन बोल, चार बोल,तुझं तोंड आहे जेवढे पाहिजे तेवढे नंबर बोल.” शिव त्याला तोंड वेडावून म्हणाला.
ध्रुव,”मी या गार्डन शेजारच्या दीप टॉवर मध्ये १० व्या फ्लोर वर राहतो, तिथून संपूर्ण बाग दिसते. १९ तारखेचा ऍक्सिडेंट मी पण तिथून पहिला होता. आणि त्याच्या २ऱ्या दिवसा पासून मी घराच्या गॅलरी मधून रात्रीच्या वेळी बघतो आहे तिथला तो झोपाळा रात्री १२ च्या सुमारास रिकामाच झोके घेत असतो. काल दुपारीच माझा चुलत भाऊ अर्जुन राहायला आला आहे. त्याला मीच सांगितले कि गार्डन च्या आतमधून शूटिंग घेऊन दाखव.”
” ठीक आहे,सुधीर तू कॉम्पुटर मध्ये सर्च करून ती FIR काढ.” शिव ने ऑर्डर केली. त्याप्रमाणे सुधीर कामाला लागला, ५ ते १० मिनिटातच त्यांनी ८ दिवसा पूर्वीची FIR काढली.
८ दिवसा पूर्वी रात्री ३ च्या सुमारास गार्डन जवळच्या हायवे वर ऍक्सिडेंट मध्ये एका 2५ वर्षीय युवकाचे on the spot death झाल्याचा फोन कॉल पोलीस स्टेशन च्या लॅन्ड लाईन वर आला. बातमी मिळाल्या वर पोलीस लगेच घटना स्थळी पोहोचले. तेथे गेल्या वर कळले कि त्या मनुष्याच्या अंगावरून ट्रक गेला आणि त्याच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा केला होता. त्याच्या काही अंतरावर त्याचे समवयस्क 4 मित्र रस्त्यावरती संवेदना हरवून खिन्न अवस्थेत बसले होते. त्यांना जाऊन विचारले तेव्हा पहिले ते काहीच बोलू शकले नाही, मोठ्या मुश्किलीने त्यातील एक जण म्हणाला,” कि ऍक्सिडेंट झालेला युवक आमचा मित्र जोगेंद्र आहे. इथल्या एका चाळी मध्ये आम्ही शेजारी शेजारीच राहतो. त्याचा वाढदिवस होता. आज या गार्डन मध्ये आम्ही चौघांनी त्याचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले. आत्ता यापुढे जे काही झाले ते आम्ही सांगू शकत नाही आमच्यात तेवढी ताकत नाहीये. हे आमचे मोबाईल तुमच्या ताब्यात देत आहोत यातील व्हिडीओ मध्ये या ऍक्सिडेंट च्या अगोदरचे अर्ध्या तासाचे शूटिंग आहे,तुम्हाला यातून पाहिजे ती माहिती मिळेल.” असे म्हणून तो पुन्हा खिन्न होऊन एका कठड्यावर बसला.
FIR मध्ये हा एवढाच रिपोर्ट होता त्यानंतर सगळे व्हिडीओ होते. त्या व्हिडीओ वर क्लिक केले आणि विडिओ चालू झाला.
गार्डन च्या गेट मधून एका ६ फुटाच्या धिप्पाड युवकाने आतमध्ये पाय ठेवल्यावर आजूबाजूचा परिसर अचानक रोषणाईने झगमगला आणि त्याच्या चारही मित्रांनी हैप्पी बर्थ डे, हैप्पी बर्थ डे चा जोरजोरात आरडा-ओरड आणि टाळ्यांचा कड- कडाट केला.
” हे what a pleasant surprise !” जोगेंद्र आश्चर्य चकित होऊन बोलला .
” आरे यार मीच हा सगळं प्लॅन केला होता, म्हंटल आपल्या दोस्ताचा वाढदिवस असाच झकास करू या.”
असे म्हणून चार मधील एक जण त्याला गार्डन मध्ये मधोमध ठेवलेल्या टेबलाजवळ घेऊन आला बाकीचे तिघे जण या सगळ्याचे मोबाइल वरून शूटिंग करीत होते. जोगेंद्र ने केक कापल्यावर सगळ्यांनी पुन्हा एकदा जोरात Happy birth day आणि टाळ्यांचा कड- कडाट केला. टाळ्यांचा कड- कडाट थांबल्यावर अचानक गार्डन मध्ये झोपाळा जोर-जोरात हलण्याचा आवाज आला. सगळ्यांनी तिकडे बघितले आणि त्याबरोबर शॉक पण झाले. तेव्हाच त्यांच्या हातातील मोबाईल चा कॅमेरा चालू होता. कारण समोरचे दृश्यच तसे होते. गार्डन मधला रिकामा झोपाळा जोर-जोरात झोके घेत होता. जोगेंद्र ने सुद्धा आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि झोपाळ्याच्या अगदी जवळ जाऊन शूटिंग करू लागला. बाकीचे त्याचे चौघे मित्र ५ फूट लांब उभे राहून शूटिंग करत होते.
“its really amazing “, जोगेंद्र झोपाळ्याच्या अगदी जवळ जाऊन शूटिंग करीत बोलला “The empty swing is swinging.” असे म्हणून त्याने झोपाळ्याची साखळी पकडून झोपाळा थांबवला.आणि २ मिनीटांनी पुन्हा सोडला .पुन्हा झोपाळा जोरजोरात झोका घेऊ लागला.
तेव्हा समोर उभे राहिलेल्या चौघांनी,”Hold it again, hold it again ” असे बोलून त्याला पुन्हा एकदा झोपाळा थांबवण्या साठी फूस लावली . जोगेंद्र ने पण पुन्हा खुश होऊन झोपाळा थांबवला आणि आपल्या मोबाईल चा कॅमेरा त्याने खाली नेला आणि तिथे बघितल्यावर भीतीने जोरात ओरडला आणि ओरडत ओरडत पळू लागला जशी काही कुठली तरी अदृश्य शक्ती त्याच्या मागे, त्याला जीवे मारण्या साठी लागली आहे! समोर उभे असलेल्या चौघा जणांच्या कॅमेरा मध्ये आणि त्यांना प्रत्यक्षात तिथे काहीच दिसले नाही. त्यांनी जोगेंद्र ला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण जोगेंद्र वाऱ्याच्या वेगाने पळत गार्डनच्या बाहेर हायवे वर गेला आणि तिथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने चिरडले. हा सगळा प्रसग बाकीच्या चौघा जणांच्या मोबाईल मध्ये वेग-वेगळ्या अँगल ने शूट झाला होता . पोलिसानी पण त्यांच्या या व्हिडीओ शूटिंग चा विटनेस साठी वापर करून जोगेंद्र च्या मृत्यू ला अपघाती मृत्यू ठरवून ओपन अँड शट केस क्लोज केली.
हा सगळा व्हिडीओ रिपोर्ट पोलीस स्टेशन मधल्या प्रत्येकाने पहिला.चार हि विदडीओ बघून झाल्यावर त्या भागातले cctv फुटेज जे त्या व्हिडीओ बरोबर सेव्ह केले होते ते पण चेक केले. पण त्यातसुद्धा जोगेंद्र कशाला घाबरून पळत होता ते काहीच दिसले नाही.
“हा जोगेंद्र कशाला घाबरून पळाला हेच काही काळात नाही. चार हि व्हिडीओ चेक केले cctv फुटेज चेक केले पण त्यात हि काही कळले नाही.” सुधीर डोक्याला हात मारून म्हणाला.
“एवढे मोठे रहस्य तर अजून हि रहस्य च राहिले आहे. आणि तुम्ही फक्त अपघाती मृत्यू सांगून फाईल क्लोज केली ?” रवी वैतागून नितीश ला म्हणाला.” हे बघा तुम्ही नंतर ट्रान्सफर होऊन आलेला आहात. मी गेले ५ वर्षा पासून या स्टेशन मध्ये ड्युटी करतो.”
तेव्हाच सुधीर ने शंका काढली… “यातील चारही जणांचे व्हिडीओ बघायला मिळाले पण यात असे दिसले कि जोगेंद्र च्या हातातील मोबाईल पण शेवटपर्यंत चालू होता. कदाचित त्यामध्ये त्यांच्या मागे कोण लागले होते आणि कशाला घाबरून तो पळाला होता? ते शूट झाले असेल. मग त्यांचा फोन कुठे आहे?”
” आरे हो रे ! या सगळ्या ओपन अँड शट केस मध्ये आपण जोगेंद्र च्या फोन बद्दल काहीच विचार केला नाही ! ” समीर डोक्याला हात मारून म्हणाला.
“याचे उत्तर आपल्या ला या cctv फुटेज मधेच मिळेल “, असे म्हणून रवी पुन्हा सगळे cctv फुटेज रिवाइंड करतो आणि सगळे जण cctv फुटेज बघू लागतात ……………..
पूर्वार्ध
Very good